मध्यंतरी दोन दिवस औरंगाबादला एका राज्य पातळीवरच्या प्रशिक्षणास जाण्याचा योग आला. इंडियन अकादमी ऑफ पेडीआट्रिक्स ( राष्ट्रीय बाल आरोग्य अकादमी ) व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी आयोजित केलेले हे प्रशिक्षण शिबीर. देशातील प्रचंड बालमृत्युचा दर कमी करण्या करिता प्रयत्नाचा एक भाग. महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यात सुरु होणाऱ्या " नवजात शिशु संरक्षण कार्यक्रम NSSK प्रशिक्षण .
नवजात बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या व तितक्याच प्रकर्षाने दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या अगदी लहानसहान व अत्यंत प्राथमिक गोष्टीचे प्रशिक्षण बालरोग तज्ञाना देण्यात आले. बालरोग तज्ञानी व इतर प्रशिक्षित डॉक्टरांनी नंतर शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना व स्टाफ नर्सेस ए.एन. एम. यांना हे प्रशिक्षण द्यावे असे या योजनेचे स्वरूप आहे. या दोन दिवसात गुदमरलेल्या बाळास जीवनदान देणे,संसर्गजन्य रोग टाळणे , बाळास उबदार ठेवणे स्तनपान देणे या प्राथमिक गोष्टी बरोबर एका महत्वाच्या विषयावर चर्चा झाली." कांगारू मदत केंद्र KMC , लहान बाळाची विशेषत:कमी वजन असणाऱ्या बाळाची, कांगारू जस आपल्या बाळाची काळजी घेते , तशी काळजी घ्यायची. केवळ या एका साध्या उपायाने अनेक विकानशील व विकसित देशातील बालमृत्यूचा दर कमालीचा कमी झाला. निसर्ग आपणास सर्व गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करीत असतो . पण आम्ही मात्र निसर्गाच्या विरोधात काम करत असतो. हा आपला देवदुर्विलास .
बाळ आईच्या पोटात असताना गरोदरपणात गर्भास ऑक्सिजन , पुरेशी उब ,अन्न पुरवठा व संरक्षण या चार गोष्टी नैसर्गिकरित्या मिळत असतात. जन्मानंतर बाळास ऑक्सिजन त्वरित मिळतो, पण पुरेशी उब, अन्न,व संरक्षण मिळाले नाही तर बाळाच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होऊ शकतो हे शास्त्रीय सत्य आहे. कांगारूच्या पिल्लाचा जेंव्हा जन्म होतो ते पिल्लू लगेच आईच्या पोटावर असलेल्या पिशवीत आगेकूच करते. या पिशवीत कांगारूचे स्तन असतात आणि बाळ लगेच स्तनपान करण्यास सुरुवात करते. अन्न पुरवठ्या बरोबरच बाळास उब आणि संरक्षण ही मिळते. या नैसर्गिक पद्धतीचा अभ्यास करून बाळ संरक्षणास एक प्रणाली अंमलात आणल्या गेली . तिचे नाव कांगारू मदर केअर
या गोष्टीचा शोध लागला तो कांगारूच्या देशात नव्हे तर दक्षिण अमेरिकेत.! कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे एके दिवशी डॉक्टर नील बर्गमन यांच्या दवाखान्यात. कमी वजनाची अनेक बाळे अडमिट झाली . बाळांना उबदार ठेवण्यासाठी इन्क़ुबेटर्स कमी पडली यामुळे त्यांनी बाळांना उब मिळावी म्हणून आईच्या उष्णतेचा वापर करण्याचे ठरविले .त्यांनी बाळास आईच्या छातीवर , दोन स्तनाच्या मध्ये गुदमरणार नाही अश्या पद्धतीने ठेवली. आणि आश्यर्य याचा चांगला परिणाम बाळांच्या प्रकुर्तीवर झाला. बाळांची वाढ चांगली झाली. या नंतर डॉक्टर यांनी जाणीवपूर्वक ही पद्धत वापरण्यास सुरुवात केली , या बाबत शास्त्रीय निरीक्षणे नोंदविली याचे फायदे नोंदवले आणि ही सर्व माहिती प्रसिद्ध केली.
१९८३ मध्ये युनिसेफ ने या पद्धतीचा स्वीकार केला. १९८५ मध्ये लसेट लन्सेट मासिकात यावर प्रदीर्घ लेख छापून आला. यानंतर हळूहळू या पद्धतीचा जगात वापर सुरु झाला.
कांगारू मदत केअर चे दोन महत्वाचे पैलू आहेत . ज्या मुळे या पद्धतीची उपयुक्तता वाढते.एक त्वचेचा
स्पर्श , या पद्धतीत आईची उब बाळा पर्यंत पोहचते . या करता बाळाच्या आणि आईच्या त्वचेचा स्पर्श होणे आवश्यक असते. बाळास फक्त लंगोट आणि डोके झाकण्यास टोपी घालतात. बाळ गरम आणि उबदार राहिले तर त्याचे वजन लवकर वाढते. दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे सतत स्तनपान ! अपूऱ्या दिवसात जन्मलेल्या बाळास योग्य आहार मिळाला नाही तर शरीरातील ग्लुकोज कमी होवून बाळाची प्रकृती नाजूक बनते. बाळ आईच्या स्तना जवळ असल्या मुळे पाहिजे तेंव्हा पाहिजे तेव्हढे दुध बाळास मिळते याचा सर्वांगीण वाढीस बाळास उपयोग होतो.
निसर्ग श्रेष्ठ आहे हे अनेक वैज्ञानिक सिद्धांताने सिद्ध झाले आहे. आई चे दुध म्हणजे एक आश्यर्य ! बाळ जर कमी दिवसात जन्मले असेल तर उदाहरणात सातव्या महिन्यातच जन्मलेले असेल तर या महिन्यात त्याला ज्या प्रकारचे दुध पचन होईल , सुयोग वाढी साठी त्याला जी प्रथिने आणि पोषक आहार आवश्यक असेल त्या प्रकारची पोषक तत्वे या दुधात असतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात बाळास आवश्यक असणारी अन्न तत्वे या दुधात आपोआप निर्माण होत असतात.असे दुध जगातील कोणत्याही कारखान्यात तय्यार करता येणे शक्य नाही.
डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर
बालरोग तज्ञ महाड कोकण
No comments:
Post a Comment